' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
आपल्या त्वचेला रंग त्यातील 'मेलॅनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे मिळतो, ज्याची निर्मिती त्वचेतील मेलॅनोसाइट पेशींमध्ये होते. या मेलॅनोसाइट पेशींचा अतिरिक्त संचय झाला म्हणजे तीळ, ल्हासे आणि जन्मखूणा तयार होतात. तीळ आणि ल्हासे जन्मावेळी किंवा नंतर कोणत्याही वयात उदभवू शकतात आणि ते त्वचेच्या कोणत्या थरात आणि शरीराच्या कोणत्या भागावर आहेत यावरून त्त्यांचे प्रकार पाडून त्यांना नावे दिलेली आहेत. कांही तीळ त्वचेच्या आतमध्ये असल्याने सपाट आणि कांही त्वचेच्या वर घुमटाकार उचललेले असतात. आकाराने मोठे किंवा भरभर वाढणारे आणि सौंदर्यात बाधा निर्माण करणारे तीळ 'रेडिओ फ्रिक्वन्सी' किंवा सीओटू लेसरने आधी त्वचेबरोबर सपाट केले जातात. नंतर गरजेनुसार त्यातील रंग 'क्यु-स्वीच्ड' लेसरने काढला जातो. असे दोन टप्प्यात केल्याने तिळाच्या जागी कोणताही व्रण किंवा खड्डा मागे राहत नाही.
गोरे गोरे गाल और उसपर काला काला 'तील' नक्कीच सौंदर्य खुलवितो परंतु असे तीळ जर भरघोस संख्येने, नको तिथे व नको तेवढे मोठे उमटू लागले तर ते नकोसे वाटतात. त्वचेतील रंगद्रव्य तयार करणाऱ्या मेलॅनोसाइट पेशींचा जर अतिरिक्त संचय झाला तर तिथे त्या पेशींच्या संख्येनुसार फिकट किंवा गडद तपकिरी ल्हासा ,काळा ल्हासा किंवा तीळ तयार होतात. यातील बरेच ल्हासे जन्मापासून असतात. पण तीळ; हे जन्माच्या वेळी फारसे आढळत नसून ते हळूहळू दिसू लागतात. तीळ संसर्गामुळे होत नाहीत तसेच ते संख्येने व आकाराने वाढतील पण कमी होत नाहीत.
गोऱ्या आणि गव्हाळ कांतीच्या चेहऱ्यावर काही ठराविक ठिकाणी असलेला एखाद दुसरा तीळ त्या चेहऱ्याच्या सौंदर्यात भर घालून त्याचे प्रमुख आकर्षण ठरतो. हनुवटी सोडून चेहऱ्याच्या मध्यरेषेवरील तीळ आकर्षक दिसत नाही. हनुवटी आणि वरच्या ओठावर एका बाजूला असणारा तीळ, गालावरील तसेच स्माईल लाईनच्या जवळचा तीळ मात्र नेहमीच आकर्षक दिसतो.
जसे नको असलेले तीळ काढता येतात तसे इतरत्र असलेला तीळ एखाद्या सौंदर्य स्थळावर रोपणही करता येतो. जरी तीळ हे अपायकारक नसले आणि त्यापासून कोणत्याही प्रकारचा त्रास नसला तरी तिळाच्या आकारात एकदम वाढ होणे, खाज किंवा कंड सुटणे, कडा लाल होणे अशी लक्षणे आढळल्यास ती चांगली समजली जात नाहीत. अपवादात्मक स्वरूपात कधी कधी त्यांचे मेलॅनोमा नावाच्या जहाल प्रकारच्या त्वचेच्या कॅन्सरमध्ये रूपांतर होण्याची शक्यता असते. सतत घर्षण होणाऱ्या जागेवर तीळ असल्यास उदाहरणार्थ - पुरुषांच्या दाढी करणाऱ्या भागावर, पायांच्या तसेच हाताच्या तळव्यावरील तीळ काढून घेणे हितकारक असते कारण सततची दुखापत होणे हे अशा रूपांतराला खतपाणी घालणारे ठरते. वरील लक्षणे दिसल्यास डॉक्टरांशी सल्ला मसलत करून निर्णय घेणे महत्वाचे ठरते. तसेच वरील प्रकारचे तसेच निव्वळ सुंदरतेचा बाधा आणणारे तीळ काढण्यासाठी खालील चार उपाय आहेत.
१. रेडिओ सर्जरी
२. प्लास्टिक सर्जरी
३. लेसर सर्जरी
४. संयुक्त ट्रीटमेंट
१. रेडिओ सर्जरी :
तीळ दिसताना जरी सपाट किंवा थोडेसे उंच दिसत असले तरी त्यांचा बराचसा भाग त्वचेखाली हिमनगासारखा लपलेला असतो. रेडिओ सर्जरीद्वारे हे तीळ अगदी आईसक्रीमचा गोळा स्कुपने उचलावा तसे त्यांच्या मुळासहित उचलले जातात. रेडिओ सर्जरीमध्ये तिळाच्या आकाराची जखम होते आणि ती
पुढच्या पाच सहा दिवसात भरून येते. त्याठिकाणी काळपट डाग पडू नये म्हणून सनस्क्रीनचा किंवा गोल बँडएडचा वापर करणे जरुरी असते.
२. प्लास्टिक सर्जरी :
मोठ्या तिळासाठी प्लास्टिक सर्जरीची पद्धत थोडी वेगळी आहे. यामध्ये तीळ आणि बाजूची त्वचा लंबगोलात विशिष्ट दिशेने काढून केसपेक्षा लहान धाग्याने एखादा टाका घातला जातो. यामध्ये कोणतीही जखम राहत नाही परंतु पुसटसा ( हेअर लाईन स्कार ) व्रण राहू शकतो. या व्रणाला तो ताजा असताना काही वेळा लेसर उपचार दिल्यास तो जवजवळ दिसेनासा होतो.
३. लेसर सर्जरी :
दीड महिन्याच्या अंतरानी दिल्या जाणाऱ्या लेसर ट्रीटमेंटनी तीळ त्याच्या आकारानुसार एक ते पाच ट्रीटमेंटमध्ये मागमूसही मागे न ठेवता घालवले जातात. हि ट्रीटमेंट फक्त तिळावर दिली जात असल्याने बाजूच्या त्वचेला अजिबात इजा होत नाही.
४. संयुक्त ट्रीटमेंट :
त्वचेच्या वर उचललेले तीळ जर चेहऱ्यावर आणि तेही नाक, गालासारख्या नजरेत भरणाऱ्या ठिकाणी असतील तर रेडिओ सर्जरीने एकाच सिटटींगमध्ये काढताना त्यांच्या त्वचेखालील भाग खोलपर्यंत असल्यास तिथे उथळसा खड्डा मागे राहण्याची शक्यता असते. अश्या वेळी रेडिओ सर्जरीने त्या तिळाचा त्वचेवरचा उचलेला भाग काढून तो सपाट केला जातो व त्वचेतील भाग हा नंतर लेसरने काही सिटटींगमध्ये खड्डा न पाडता काढला जातो.
वैधानिक इशारा : बऱ्याचदा विशिष्ट तीळ हे जन्मखूण किंवा परिचय चिन्ह म्हणून नोंदवलेले असतात. असे तीळ जर कोण्ही काढून घेणार असतील तर त्यांनी डॉक्टरांना तशी पूर्वकल्पना देणे आवश्यक आहे. त्यानुसार नोंदी केल्यास तसे सर्टिफिकेट देता येते व भविष्यातील गैरसोय टाळता येते .