'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
डोक्याची कवटी आणि चेहऱ्याची हाडे यामधील काही जन्मजात व्यंगांमुळे त्याव्यक्तीचा चेहरा अतिशय भयावह दिसतो. त्यातील काहीजणांच्या डोळ्यातील अंतर जास्त असते. तर काहींचे नाक एकदम बसके असते. अशा व्यंगासाठी वरवरच्या सर्जरीने काडीचाही फायदा होत नाही. कवटी आणि चेहऱ्याची हाडे उघडून ती कापून योग्य जागी बसवून तिथे टीटॅनियमच्या प्लेट्स आणि स्क्रू ने फिक्स करावी लागतात . चेहऱ्याच्या हाडाची सर्जरी प्लास्टिक सर्जन करतात परंतु कवटीच्या हाडावरील सर्जरीसाठी त्यांना न्यूरो सर्जनची मदत घ्यावी लागते. अशी ऑपरेशन सहसा मोठ्या हॉस्पिटल मध्ये केली जातात. अशा व्यंगामुळे समाजातून जवळ जवळ बाहेर फेकल्या गेलेल्या व्यक्तींना समाज प्रवाहात समावण्यासाठी क्रेनिओ फेशिअल सर्जरीची मोलाची मदत होत असते.