'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
त्वचा हे शरीराचे संरक्षक कवच आहे. भाजल्यामुळे हे संरक्षण नाहीसे झाल्याने हजीवीतास धोका संभवतो. भाजलेल्या रुग्णांचा संपूर्ण उपचार पाच टप्प्यामध्ये केला जातो. दोन आठवड्यांच्या पहिल्या टप्प्यात जास्त प्रमाणावर भाजलेल्या रुग्णांचा जीव वाचविणे हे प्रमुख ध्येय असते. त्यासाठी सलाईन , प्रतिजैविके , जखमांचे ड्रेसिंग , जंतू विरहित नर्सिंग आणि गरजेनुसार ' आय सी यु केअर ' ची मदत घेतली जाते. दुसऱ्या टप्प्यात जखमा लवकरात लवकर भरून येण्यासाठी खर्ची पडतो. भाजलेल्या रुग्णामध्ये जखमांची काळजी घेणे आणि जंतू प्रादुर्भाव टाळणे हे महत्वाचे असते. शेवटी भाजलेली त्वचा काढून तिथे दुसरीकडची त्वचा लावावी लागते. हे त्वचारोपण प्लास्टिक सर्जन करत असल्याने सुरवातीपासूनच जर पेशन्ट त्यांच्या देखरेखीखाली राहिला तर उपचारात सुसूत्रता राहते. तिसरा टप्पा जखमा भरून पेशंट घरी गेल्यानंतर सुरु होतो. त्यावेळी व्रणासाठी मलम, मसाज आणि फिजिओथेरपीची गरज असते भाजलेल्या जखमांचे व्रण हमखास जाड होऊन, सांधे आखडायला सुरवात होते. यावेळी व्रणांवर दाब देणारे घट्ट प्रेशर गारमेंट्स दिवसरात्र २४ तास घालणे अत्यंत महत्वाचे असते. एवढी काळजी घेऊन सुद्धा काहींचे सांधे आखडतात. त्यासाठी चौथ्या टप्प्यात ६ ते ९ महिने व्रण जुने होण्यासाठी थांबून नंतर ते ऑपरेशनने सोडवून त्या ठिकाणी त्वचा लावावी लागते आणि परत फिजिओथेरपी घ्यावी लागते. शेवटच्या पाचव्या टप्प्यात खराब दिसणाऱ्या व्रणांसाठी मलम ऑपरेशन किंवा लेसर ट्रीटमेंट दिली जाते.