' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
सौंदर्याआड येणारे बारीक आणि काळे ओठ
पातळ नाजूक ओठ हे स्त्रीसौंदर्याचं जरी लक्षण असलं, तरी प्रमाणापेक्षा बारीकी ओठ आणि तेही ठळक वैशिष्ट्य असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याला शोभा देत नाहीत. अशा ओठांना तुमच्या शरीरातील काही उती किंवा तयार मिळणारे 'फिलर्स' वापरून फुल्ल आणि कामुक दिसतील असे पाऊटिंग करता येतात. काही कुटुंबातील स्त्रियांमध्ये अनुवांशिकतेमुळे आणि पुरुषामध्ये धूम्रपानामुळे ओठ काळे पडलेले आढळतात. यासाठी आजतागायत कोणताही उपाय नव्हता. आता मात्र लेसरच्या क्यू-स्विच्ड तंत्रातील प्रगतीमुळे ओठासारख्या नाजूक आणि संवेदनशील भागावरील डाग आणि त्याचा काळवटपणा कोणतीही इजा न पोहोचविता कायमचा घालविता येतो.
ओठांचे सौंदर्य
एखाद्यानं दिलेलं छानसं स्माईल तुमचा दिवस सुखावह बनवून जात असं म्हणतात ते काही खोट नाही. तुमच्याही चेहऱ्यावर असच सुंदरसं हास्य तुमचा आणि इतरांचाही दिवस आनंदात जाण्याची सुरवात करू शकतं.
भावना वाक्य करण्यासाठी आपल्या चेहऱ्याच्या त्वचेखाली दोन्ही बाजूंना मिळून जवळजवळ ३८ स्नायू असतात आणि त्यातील बरेच एकत्रितपणे किंवा क्रमाक्रमाने आकुंचन पावत असल्यामुळे आपण निरनिराळ्या भावना व्यक्त करू शकतो. हसताना यातील; जवळजवळ सर्वांचाच समावेश असला तरी ओठ मात्र अहं भूमिका निभावतात. एखाद्याचे डोळे हसरे आहेत असे आपण म्हणतो, पण तरीसुद्धा ओठांची अजिबात हालचाल न करता हसण्याचा प्रयत्न करून पहा म्हणजे तुमच्या लक्ष्यात येईल कि हर्षभाव व्यक्त करण्यास ओठांशिवाय पर्याय नाही. म्हणूनच तुमचं हास्य तुमच्या चेहऱ्यावर पसरवून चेहऱ्याला अधिक सुंदर करण्यासाठी ओठांची तुम्ही खास काळजी घ्यायला हवी.
तस पाहिलं तर चेहऱ्याच्या एकूण रचनेत नाकाखालोखाल ओठांची भूमिका महत्वाची आहे. ओठांचे मुख्य कार्य हे मुखद्वार नियंत्रित करण्याचे असल्याने वरच्या आणि खालच्या ओठात मिळून ' ऑर्बिक्यूलॅरीस ओरिस ' नावाचा एक चपटा, लंबगोल ऐच्छिक प्रकारचा स्नायू असतो. कॅमेऱ्याचे शटर किंवा डोळ्यातील बाहुली ज्याप्रमाणे आकुंचन आणि प्रसारण पावते त्याप्रमाणे तोंड लहान किंवा मोठे करण्याचे काम हा स्नायू करतो. इतकेच न्हवे तर 'आ वासून पाहणे , तोंडाचा चंबू करणे, शील घालणे, डोळे मिचकावने आणि लाजून ओठात करंगळी दाबणे ' यासारख्या सुद्धा भावमुद्रा या स्नायूमुळेच होत असतात.
वरचा ओठ गालापासून आणि खालचा ओठ खालच्या जबड्यापासून एखाद्या झडपेसारखा लटकत असल्याने त्यातील स्नायू तिन्ही बाजूंनी वेष्टीलेला असतो. बाहेरून चेहऱ्याची त्वचा, आतून तोंडातील नाजूक त्वचेचे आवरण आणि ओठांच्या कडांवर मात्र या दोन्हीमधल्या नाजूक गुलाबी त्वचेचे पातळ थर असतात. हे आवरण पातळ असल्यामुळेच त्याखालील केशवाहिन्यातील लाल रक्तांमुळे ओठांना गुलाबी छटा प्राप्त होते. ओठांच्या या भागाला ' वर्मिलिऑन ' म्हणतात आणि इथेच निरनिराळ्या रंगाची लिपस्टिक लावून ओठांचे सौंदर्य खुलविण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु ओठांचे खरे सौंदर्य हे ' त्यांची लांबी, रुंदी आणि व्हॅल्युम म्हणजे त्यातील स्नायूंची पुष्टता, वर्मीलिऑनची रुंदी आणि त्याचा रंग आणि दोन्ही ओठांच्या कडा दातांकडे आत वळतात की विभक्त होतात म्हणजेच ओठ पाऊटिंग आहेत कि नाहीत यावर अवलंबुन असतं. काही जणांच्या बाबतीत वरच्या ओठांची वर्मीलिऑन त्वचा प्रमाणापेक्षा जास्त रुंद आणि सैल असते त्यामुळे जेव्हा जेव्हा हे लोक हसतात तेव्हा वरच्या ओठाला आडवी घडी पडते आणि त्याखालील हा सैल वर्मिलिऑन 'डबल लीप ' सारखा विचित्र आणि खराब दिसतो. प्लास्टिक सर्जरीतील एका सोप्या आणि जागा बधिर करून केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रियेने हि सैल त्वचा काढून त्यांना त्यांचे नैसर्गिक हास्य परत मिळवून देण्यास मदत करता येते.
ओठांच्या आकराविषयी पहायचं झालं तर वरच्या ओठाची नाकापासूनची उंची जर प्रमाणापेक्षा जास्त असेल तर असा ओठ उत्क्रांतीतल्या आपल्या पूर्वजांची आठवण करून देतो आणि म्हणूनच त्याला 'सिमीयन लीप' म्हणतात. जाड-जुड 'व्हॅल्युमिनस ओठ आपल्या आफ्रिकन बांधवात आढळतात आणि ते त्यांच्या धिप्पाड शरीरयष्टीला आणि ठळक उंचवटे असलेल्या मोठ्या चेहऱ्यात खपून जातात. उतारवयात दातांचा आधार नाहीसा झाल्याने आणि स्नायू लहान झाल्याने आऊट पातळ होतात आणि आत वळतात. जर तरुणपणीच एखाद्याचे ओठ असे पातळ आणि आत वळलेले असतील तर मात्र अशा चेहऱ्यावर वार्धक्याची झाक उमटते. बारीक नाजूक ओठ जरी स्त्री सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलं असलं तरी प्रमाणापेक्षा बारीक ओठ आणि तेही मोठ्या आणि ठळक वैशिष्ट्ये असलेल्या स्त्रीच्या चेहऱ्याला शोभा देत नाहीत. अशा ओठांना स्वतःच्या शरीरातील काही प्रकारच्या उती वापरून किंवा बाजारात तयार मिळणारे 'फिलर्स' वापरून वृद्धिंगत म्हणजेच फुल्ल तसेच पाऊटिंग करता येतात.
वरच्या ओठाची त्वचा वर्मिलिऑनला जिथे मिळते तिथे हलक्या रंगाचा १ ते २ मी मी जाडीचा उंचवटा तयार झालेला असतो, याला व्हाईट रोल म्हणतात. हा व्हाईट रोल तोंडाच्या दोन्ही कडापासून पुसटसा सुरु होतो आणि जसजसा ओठाच्या मध्याकडे येतो तसतसा तो जास्तच ठळक होत जातो. वरच्या ओठाच्या मधल्या भागाची रचना वैशिष्टपूर्ण असून याला ' फिल्ट्रम ' म्हणतात. नाकाच्या पडद्याचा खालचा भाग जिथे ओठाला मिळतो थेथून उंचवट्याला दोन रेषा खाली व्हाईट रोल ला येऊन मिळतात याना ' फिल्ट्रम कॉलम ' म्हणतात. तोंडाच्या कडापासून वरवर जाणारा व्हाईट रोल फिल्ट्रम कॉलमला स्पर्श करून मध्य रेषेपर्यंत खाली वळतो. दोन्ही ' फिल्ट्रम कॉलम ' आणि त्यामधील डायमंड आकाराच्या उथळ खांद्याला ' फिल्ट्रल डिंपल' म्हणतात अशा या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे वरच्या ओठांच्या वर्मिलिऑनचा भाग एखादे धनुष्य आडवे ठेवल्यासारखा दिसतो. वक्र व्हाईट रोल म्हणजे धनुष्य आणि ओठांची खालची सरळ रेषा म्हणजे त्याचा न ताणलेला प्रत्यंचा. शरीर विज्ञान शास्त्रात ग्रीक आणि रोमन काळात झालेल्या संशोधनामुळे अवयवांची बहुतेक नावे हि ग्रीक दिली गेली आहेत. आपण जस प्रेमाचं दैवत 'मदन' तस त्यांचं 'क्युपिड' आणि म्हणून ओठांच्या या भागाला क्युपिडचे धनुष्य म्हणून संबोधतात.असं म्हणतात कि प्रेमवीर आणि प्रेमिका या क्युपिडच्या धनुष्यातून मदन बाणांचा वर्षाव करून एकमेकांना घायाळ करतात. आणि तस पाहिलं; तर अगदी ठळक फिल्ट्रल कॉलम आणि खोलगट फिल्ट्रल डिंपल हे पुरुषात हँडसमपणाचे लक्षण सुद्धा समजलं जात.
चेहऱ्याच्या एकूणच ठेवणीत वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या आणि व्यक्तिमत्वाचा महत्वाचा हिस्सा बनलेल्या ओठांचं उपजत सौंदर्य प्लास्टिक सर्जरी तसेच कॉस्मेटिक सर्जरी आणि निरनिराळे फिलर्स वापरून वृद्धिंगत करता येत. शरीराच्या इतर भागावरील त्वचेप्रमाणे ओठावरील त्वचेच्या सर्वसाधारण समस्या म्हणजे ओठांना चिरा पडणं, तोंड आल्यामुळे अल्सर होणं, कडांजवळ ज्वर उठणं आणि ओठ काळपट पडणं, त्वचेत सर्वत्र असणारे मेलॅनिन द्रव्य मात्र ओठांच्या कडांवर आढळत नाही. परंतु काही कुटुंबामध्ये अनुवंशीकतेमुळे आणि ठराविक आजारामुळे तसेच औषधांच्या अलर्जीमुळे ओठ काळवंडू शकतात. पुरुषांमध्ये ओठ काळे पडण्याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे धूम्रपान. धूम्रपानाचे इतरही असंख्य तोटे आहेतच त्यातला एक महत्वाचा तोटा म्हणजे गुलाबी ओठ काळे पडणे हा होय. चेहरा किंवा शरीरावरची काळवंडलेली त्वचा काही मलम वापरून पूर्ववत उजळ करता येते मात्र अशी मलम ओठांच्या नाजूक त्वचेला सहन होत नाही तसेच पोटात जाण्याच्या भीतीने वापरताहि येत नाही. त्यामुळे ओठांच्या काळपटपणावर आतापर्यंत उपाय नव्हता. लेसर तंत्रातील प्रगतीमुळे मात्र आता ओठांसारख्या नाजूक भागावरील तीळ, डाग आणि त्वचा काळपटपणा काही सिटटींगमध्येच परिणामकारकरित्या आणि कायमस्वरूपी घालवता येतो.