' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
स्त्री पुरुष दोहोंच्या शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेले केस आता लेसरने कायमस्वरूपी समूळ नष्ट करता येतात केशमूळांतील काळ्या रंगाच्या मेलॅनिनमध्ये लेसर लहरी शोषल्या जातात. तेथील तापमान ७० अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याने केस तयार करणाऱ्या पेशींचं नष्ट होतात.
तरुणाईतील जोश, मित्र-मैत्रिणींचा आग्रह, प्रेमातील आणाभाका किंवा रूढी म्हणून कपाळ, हनुवटी, हात, दंड, तसेच छातीवर गोंदवून घेतात.कालांतराणे त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा उंचावल्यामुळे हि गोंदाने त्यांना एखाद्या शल्यासारखी सतत बोचत राहतात. ती घालवण्याच्या प्रयत्नात मग चुना पापडखार लावणे, सुयांनी टोचणे आणि उदबत्तीने डागणे यासारखे अघोरी प्रकार केले जातात. परंतु त्यामुळे गोंदण परवडले पण मागे राहिलेला व्रण नको, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते.
गोंदण घालविणे हे म्हणावे तितके सोपे नसते, कारण कायमचे रहावे म्हणूनच तर गोंदवून घेतात. गोंदविताना कार्बन कण, शाई आणि रंगाचे मिश्रण अणकुचीदार सुयांच्या सहाय्याने त्वचेत टोचतात. सुया आत जाणारे मार्ग भरून आल्यानंतर रंगीत कण त्वचेत खोलवर रुतून बसतात. या कणांचा आकार मोठा असल्याने शरीरातील उत्सर्जनाचे कार्य करणाऱ्या पेशी त्यांना काढून टाकू शकत नाहीत ; प्लास्टिक सर्जेरीने लहान आकाराची गोंदणे काढता येतात; परंतु त्यामुळे लहान का असेना, व्रण हा मागे राहतोच. आता मात्र लेसरमुले या सर्व अडचणीवर मात केली आहे. नॅनो तंत्राच्या क्यु- स्विच्ड लेसरने तपकिरी - काळे ल्हासे आणि जन्मखूणा पूर्णपणे काढता येतात. चेहऱ्यावर डोळ्याभोवतालचा भाग व्यापणारा आणि त्वचेत सर्वात खोलवर असलेला ' निव्ह्स ऑफ ओटा ' साठी तर या लेसरला पर्याय नाही . इतकेच न्हवे तर ज्यांना आपली कांती उजळ करावीशी वाटते त्यांच्यासाठी 'स्किन लाईटनिंग' हा पर्याय उपलब्ध असून त्यांच्या प्रत्येक सिटींग्सगणिक ती अधिकाधिक उजळ होत जाते.
हिमांजिओमा म्हणजे लहान मुलांच्या त्वचेवर उठणारी रक्तवाहिन्यांची लाल मऊ गाठ. जन्मानंतर पहिल्या काही आठवड्यातच ती दिसू लागते.
वरकरणी जरी या गाठी सध्या वाटत असल्या, तरी पाच कारणांनी त्या त्रासदायक ठरू शकतात.
1. पहिले म्हणजे चेहरा किंवा उगड्या भागावर असल्यास त्या सौंदर्याच्या आड येतात,
2. दुसरे म्हणजे जर त्या डोके, पाय, पाठ, अशा वारंवार घासल्या जाणाऱ्या भागावर असतील तर मर लागल्याने त्यातून भळभळ रक्त वाहू लागते.
3. तिसरे म्हणजे पापण्यांवरील हिमांजिओमाने डोळा बंद झाल्यास डोळ्याची वाढ कायमची खुंटून डोळा लहान राहू शकतो. अशा वेळी उपचार तातडीने करावे लागतात.
4. चौथे म्हणजे यातील काही गाठी इतक्या भरभर वाढतात, कि चेहऱ्याचा निम्मा भाग व्यापून टाकतात, भरभर वाढीमूळे त्यांवर जखमा होतात आणि त्या लवकर भरत नाहीत.
5. पाचवे आणि मह्त्वाचे कारण म्हणजे सुरवातीला कोणती गाठ किती मोठी होणार आणि ती कशी पसरणार, हे कोणीही छातीठोकपणे सांगू शकत नाही. त्यामुळे उपचार लवकर सुरु केलेले कधीही चांगले.
पूर्वी हिमांजिओमासाठी परिणामकारक असा उपचार नव्हता, म्हणून डॉक्टरांकडून सुद्धा 'थांबा आणि पहा' असा सल्ला दिला जायचा. आता एन दि याग लेसर यावर अतिशय प्रभावी ठरले असून त्यामुळे हिमांजिओमाच्या गाठींची वाढ लगेच थांबते. प्रत्येक लेसर उपचारागणिक त्यांचा आकार कमी होत जाऊन त्या पूर्णपणे निघून जातात तेही कसलाही व्रण अथवा डाग मागे न ठेवता …!
त्वचा हे बाह्य आवरण असल्याने प्रथमदर्शनी चटकन नजरेत भरते. नितळ त्वचा म्हणजे जिच्यावर पिंपल्स, खड्डे, ओपन पोअर्स, व्रण किंवा एकही डाग नाही अशी स्मूथ स्किन. मग ती कोणत्याही रंगाची असली तरी छानच दिसते. जर ती तशी नसेल, तर मात्र आता लेसरच्या माध्यमातून प्रयत्न करणे शक्य आहे. पिंपल्सच्या खड्ड्यांसाठी आजगायत विनाशस्त्रक्रिया परिणामकारक असा उपचार नव्हता. परंतु लेसरमधील 'फ्रॅक्शनेशन' तंत्राच्या शोधामुळे आता ते शक्य झाले आहे . फ्रॅक्शनेशन म्हणजे विभागाणे . यात सीओटू लेसरचा बीम केसांपेक्षाही बारीक अशा शेकडो सूक्ष्म किरणात विभागला जातो स्कॅनरच्या सहाय्याने त्यांची संख्या आणि त्वचेत उतरण्याची खोली ठरवता येते. एका चौरस सेंटीमीटर मध्ये असे २४ पासून ६१८ सूक्ष्म किरण घेऊन खोल खड्ड्यांसाठी मध्यापर्यंत आणि ओपन पोअर्ससाठी त्वचेच्या वरच्या थरापर्यंत पोहोचणारी सूक्ष्मतम छिद्रे पडली जातात. या छिद्रांना त्वचेतील सूक्ष्म जखमा समजून त्या भरण्याची नैसर्गिक प्रक्रिया शरीराकडून लगेचच सुरु होते या प्रक्रियेत अंत:त्वचेच्या थरात कोलॅजनची निर्मिती झाल्याने प्रत्येक ट्रीटमेंट नंतर खड्ड्यांची तीव्रता कमी कमी होत जाऊन खड्डे आणि व्रण पुसटसे होतात तसेच त्वचेचा खरबरीतपणा कमी होऊन ओपन पोअर्स नाहीशी होऊन त्वचा नितळ आणि स्मूथ होते
आपल्या त्वचेला रंग त्यातील 'मेलॅनिन' नावाच्या रंगद्रव्यामुळे मिळतो , ज्याची निर्मिती त्वचेतील मेलॅनोसाइट पेशीमध्ये होते. या मेलॅनोसाइट पेशिंचा अतिरिक्त संचय झाला म्हणजे तीळ, ल्हासे आणि जन्मखूणा तयार होतात. तीळ आणि ल्हासे जन्मावेळी किंवा नंतर कोणत्याही वयात उद्भवू शकतात आणि ते त्वचेच्या कोणत्या थरात आणि शरीराच्या कोणत्या भागावर आहेत यावरून त्त्यांचे प्रकार पडतात आणि त्यांना नावे दिलेली आहेत. बाह्य त्वचेतील ल्हासे हे सहसा फिकट किंवा गडद तपकिरी रंगाचे असतात आणि त्यांच्या कसा आखल्यासारख्या स्पष्ट ओळखता येतात आंतरत्वचेतील ल्हासे काळपट किंवा निळसर असतात आणि ते कडेला अस्पष्ट होत जातात. तिळाचा किंवा ल्हाश्याचा गडदपणा हा त्यातील रंग-द्रव्याचा घनतेवर अवलंबून असतो. तसेच काही ल्हाशांवर जन्मतःच केस असतात तर काहींवर ते पौगंडावस्थेत येतात. फक्त रंग गडद आहे म्हणू प्लास्टिक सर्जरीने ल्हाश्याच्या ठिकाणची त्वचा बदलणे म्हणजे त्वचेवर अन्याय करण्यासाखे आहे आणि तसे केले तरी ते त्वचेला ठिगळ लावल्यासारखे दिसते. न पसरणारा ल्हासा जरी म्हंटल, तरी तो जिवंत पेशींनी बनलेला असतो. त्वचेत इतरत्र होते तशी पेशींची उलाढाल तेथेही सतत सुरु असते. लेसर आणि नॅनो तंत्रातील प्रगतीमुळे तयार झालेल्या ' क्यू-स्विच्ड' लेसरने या मेलॅनोसाइट पेशींचा अचूक नाश आणि तेही बाजूंच्या पेशींना इजा न पोहोचविता करणे शक्य झाले आहे. यामुळे ल्हासे आणि तीळ फिक्कट फिक्कट होत काही सिटीग्जमध्ये पूर्णपणे नाहीसे होतात. आणि तेथे त्वचेवर कोणताही डाग अथवा व्रण मागे राहत नाही.
बाह्यत्वचेतील पेशींची वाढ झाल्याने चामखीळ, स्किन टॅग्स आणि व्हायरल वाँर्टस तयार होतात. मान,चेहरा आणि काखेत तसेच उतारवयात आणि स्थूल प्रकृतीच्या व्यक्तीमध्ये ते जास्त आढळतात. रेडिओ फ्रीक्वन्सी किंवा सीओटू लेसरने ते विनाकष्ट एकाच सिटिंगमध्ये अलगदपणे काढले जातात
गडद रंगाच्या ल्हाश्यांना पूर्वी इलाज नसल्याने जन्मखूण म्हणून ते जन्मभर अंगावर वागवले जात असत. आय पी एल, क्यू स्वीच्ड किंवा फ्रॅक्शनल सीओटू लेसरने असे ल्हासे त्वचेला कोणतीही इजा न करता किंवा मागे कोणताही डाग राहू न देता काही सिटीन्ग्समध्ये कायमचे काढता येतात. चेहऱ्यावर डोळ्याभोवतालचा भाग व्यापणारा आणि त्वचेत खोलवर असणारा 'निव्ह्स ऑफ ओटा' काढण्यासाठी तर 'क्यू स्वीच्ड' लेसर ला पर्याय नाही. त्याच प्रमाणे टीन एजर्समध्ये खांद्याच्या मागे पुढे दिसणारा 'बेकर' चा ल्हासा आणि अगदी फिकट तपकिरी ' कॅफे ओले मॅक्युल' सुद्धा या लेसरने काढले जातात.
मध्यम वयाच्या स्त्रियांच्या गालावर, नाक तसेच ओठ आणि भुवयांच्या वरच्या बाजूला जर तपकिरी डाग उठले तर तो वांग असण्याची शक्यता जास्त असते. त्वचेतील हे अतिरिक्त मेलॅनिन कमी करणारी क्रीम आणि सनस्क्रीनच्या जोडीला जर लेसरचा वापर केला तर वांग पूर्णपणे जाऊ शकतो. नंतर मात्र तो परत उदभवू नये म्हणून नेहमी सनस्क्रिनचा वापर आणि उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे महत्वाचे ठरते.