'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
दोन पेशींच्या मिलनातून तयार होणारे मानवी शरीर म्हणजे निसर्गाची एक अद्भुत किमयाच आहे. हे सर्व होत असताना , जर कुठे थोडी गडबड झाली, तर ती व्यंगात रूपांतरित होते. सर्वसाधारणपणे सर्वच बाह्य शारीरिक व्यंगावर प्लास्टिक सर्जरीने यशस्वी उपचार करता येतात, अशा व्यंगाची यादी मोठी असून त्यात प्रामुख्याने खालील व्यंगांचा समावेश होतो.
1. फाटलेले किंवा दुभंगलेले ओठ आणि टाळू
2. लहान आकाराचे आणि दुमडलेले कान
3. वटवाघळासारखे उभारलेले कान अर्थात बॅट इयर
4. हातापायाची जास्तीची किंवा चिकटलेली बोटे
5. मुलांच्या लघवीची जागा नेहमीपेक्षा मागे असल्याने शिश्नात आलेली वक्रता
6. मुलींच्या योनीमार्गातील कमतरता आणि व्यंगे इ .
पापण्यांची व्यंगे जन्मतः किंवा नंतर काही कारणांनी वरची पापणी खाली पडल्यामुळे डोळ्यावर झापड येते किंवा मार लागल्याने , भाजण्यामुळे पापण्या आखडतात त्यासाठी स्थायूंवर ऑपरेशन करून किंवा त्वचा रोपण करून व्यंग नाहीसे केले जाते.
थोडक्यात काय निसर्गाने आपल्याकडून जिथे जिथे कमतरता ठेवली आहे, तिथे तिथे रुग्णाच्याच मासपेशींचा काटकसरीने वापर करून ती कमतरता शक्य तितक्या नैसर्गिकरित्या भरून काढण्याच्या कामासाठीच प्लास्टिक सर्जनची निर्मिती केली आहे. पुनःनिर्माण करण्याचे हे काम रीक्न्स्ट्रक्टिव्ह सर्जरीने केले जाते.