' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
बाणेदार नाकासाठी - ऱ्हायनोप्लास्टी एखाद्या व्यक्तीला पाहिल्यानंतर त्याच्याविषयी सर्वात जास्त लक्ष्यात राहणारी गोष्ट म्हणजे त्याचा चेहरा आणि म्हणूनच व्यक्तिमत्त्वामध्ये चेहऱ्याला अनन्यसाधारण महत्व आहे. चेहरा हा तीन समान भागात विभागता येतो. सर्वात वरती चौकोनी आकाराचे कपाळाचे उतरते पठार असते. सर्वात खालील भागातील ओठ आणि जीवणी जरी लक्ष वेधत असले, तरी भुवयापासून ओठापर्यंतचा मधला भागच सौन्दर्य खुलविण्यात अहं भूमिका निभावतो. कारण या भागात दोन बोलके डोळे, त्याखालील गालाचे उंचवटे आणि दोन्ही बाजूला कानाची ठेवण आणि मधोमध नाक असे महत्वाचे अवयव आहेत. अशा रीतीने चेहऱ्याच्या केंद्रस्थानी असलेल्या नाकावर जर लक्ष केंद्रित न झाले तर नवल ! म्हणूनच नाकाचा थोडासा वक्रपणा, बसकेपणा, रुंदपणा किंवा नाकपुड्यांची जाडी लोकांच्या नजरेत चटकन भरते. उंच सरळ आणि बाणेदार नाकामुळे व्यक्तिमत्वाला एक निराळीच उंची प्राप्त होत असते; परंतु असे नाक मिळण्याचे भाग्य सर्वांच्या नशिबी असते , असे नाही. सौन्दर्य शस्त्रक्रियेतील ऱ्हायनोप्लास्टी ऑपरेशनने मात्र आता आपल्याला हवे तसे नाक मिळू शकते. यामध्ये मुख्यतः इम्प्लांट ने नाकाची दांडी उचलणे आणि सरळ करणे, 'टीप - प्लास्टीने' नाकाचा शेंडा लहान करणे किंवा जाड नाकपुड्या बारीक करणे याचा समावेश असतो. याबरोबरीने गरजेनुसार नाकाचा पडदा सरळ करून श्वासोच्छवासातील अडथळा 'सेप्टोप्लास्टीने' दूर केला जातो.