'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
सन १९८० च्या दरम्यान सुक्षमदर्शकातून केल्या जाणाऱ्या ' मायक्रो सर्जरीची' सुरवात झाली. अपघटणे तुटलेले हात, पाय, बोटे, कान इ. त्यांच्या रक्तवाहिन्या केसांपेक्षाही सूक्ष्म धाग्यांनी जोडून पूर्ववत शरीरावर जोडणे शक्य झाले. याच तंत्राचा वापर करून आता शरीराच्या इतर भागातील पूर्ण जाडीची त्वचा, स्नायू आणि गरजेनुसार त्याखालील हाडांचा भाग त्यांच्या रक्तवाहिन्यासह उचलून कॅन्सरमुले काढलेल्या किंवा अपघाताने खराब झालेल्या जागी रोपण करता येते. याला 'फ्री फ्लॉप्स' असे म्हणतात. याचा फायदा असा झाला पुनःनिर्माणाची खात्री झाल्याने कॅन्सर सर्जन रोगग्रस्त भाग समूळ काढू लागले आणि कॅन्सर तिथेच परत उदभवण्याची शक्यता धूसर होत गेली. रीकन्स्ट्रक्शन जवळजवळ पूर्ववत झाल्याने रुग्ण उर्वरित जीवन सामान्यपणे जगू लागले. निकामी झालेली किडनी , यकृत किंवा हृदय काढून तेथे जसे दात्याकडून घेतलेला अवयव ट्रान्सप्लांट केला जातो, तसेच आता अपघाताने विद्रुप झालेला किंवा जळालेला संपूर्ण चेहरा बदलण्याची ' फेस ट्रान्सप्लांट ' शस्त्रक्रियासुद्धा यशस्वी झाली आहे.