'प्लास्टिक सर्जरी'
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो.
गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
चेहरा हा व्यक्तीच्या मनाचा आरसा म्हणला जातो, आणि तो व्यक्तिमत्वाचा सर्वात महत्वाचा भाग आहे. अपघाताने जेव्हा चेहऱ्याला मर लागून जखमा होतात , तेव्हा रुग्णाला आणि नातेवाईकांना सर्वात जास्त काळजी वाटते, ती तयार होणाऱ्या व्रणांविषयी, रस्त्यावरील अपघात, प्रवासादरम्यान दुखापत झाल्याने आणि जखमांमुळे घाबरून गेल्यामुळे सहसा जवळच्या डॉक्टरकडून टाके घातले जातात. परंतु जर याच जखमा प्लास्टिक सर्जरीने टाके घालून बंद केल्या तर राहणारे व्रण हे कमीत कमी दिसतात यासाठी ते भिंगाखाली पाहून मोठ्या दिसणाऱ्या जखमेला केसासारख्या बारीक धाग्यांनी अगदी व्यवस्थित जिथल्या तिथे शिवतात. शरीराच्या इतर भागांपेक्षा चेहऱ्याचा रक्तपुरवठा जास्त असल्याने २४ तासापर्यंत टाके घातले तरी चालतात. घाबरून जाऊन घाई गडबडीत जाड दोऱ्यांनी जखमा शिवून घेऊन जन्मभर जाडसर व्रण चेहऱ्यावर वागवण्यापेक्षा प्राथमिक मलमपट्टी करून घेऊन जवळच्या प्लास्टिक सर्जनकडे गेलेले कधीही हितावह ठरते.