' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
स्त्री पुरुष दोहोंच्या शरीराच्या कोणत्याही भागावरील नको असलेले केस आता लेसरने कायमस्वरूपी समूळ नष्ट करता येतात. केशमुळातील काळ्या रंगाच्या मेलॅनिनमध्ये लेसर लहरी शोषल्या जातात. तेथील तापमान ७० अंश सेल्सिअस पर्यंत वाढल्याने केस तयार करणाऱ्या पेशीच नष्ट होतात.
लेसर हेअर रिमुवल
लेसर उपचारप्रणाली पूर्णतः संगणकचलीतअसते. उपचार करण्यापूर्वी क्लायंटची समस्या, त्याचे वय, त्वचेचा रंग, उपचाराची जागा, केसांचे प्रमाण त्यांची जाडी या सर्वांचा अभ्यास करून क्लायंटला कोणत्या प्रकारची , किती क्षमतेची, किती सेकंदाची लेसर ट्रीटमेंट द्यायची हे ठरविले जाते.
त्वचेचा रंग व केसचा रंग यातील विरोधाभास जितका जास्त तितका लेसरचा परिणाम जास्त व केसांचे समूळ उच्चाट्न सोपे. गोऱ्या त्वचेवरील काळे केस हे सावळ्या त्वचेवरील काळ्या केसांपेक्षा सहज काढता येतात. सावळ्या त्वचेवरील केस त्वचेपेक्षा जास्त गडद रंगाचा असेल तरच जाऊ शकतो. त्वचेच्या रंगापेक्षा केसांचा रंग फिकट असल्यास लेसर उपचार सध्या परिणामकारक ठरत नाहीत आणि म्हणूनच सोनेरी आणि पांढऱ्या रंगाच्या केसांवर लेसरचा काहीच परिणाम होत नाही.
सर्वसामान्य व्यक्तीला असे वाटते की, विरळ केस किंवा बारीक लव सहजासहजी जात असावी. लेसर उपचारामध्ये मात्र अगदी त्याच्याविरुद्ध घडते. केस जेवढा जाड किंवा राठ तसेच जेवढा गडद काळा व त्वचेचा रंग गोरा, तितका तो लवकर नष्ट होतो कारण जाड व काळ्या केसात लेसर किरणांचे शोषण जास्त प्रमाणात होते. लव, विरळ व भुऱ्या केसात लेसर किरण जास्त शोषले जात नसल्यामुळे यावर जास्त तीव्रतेच्या लेसर किरणांचा मारा करावा लागतो. बऱ्याचदा एवढी तीव्रता त्वचेला सहन होत नाही आणि म्हणूनच बारीक केस लेसरने नष्ट करणे म्हणजे तारेवरच्या कसरतीसारखे असते याचा अर्थ असा नव्हे कि बारीक केसावर लेसर हा उपाय नाही. लेसर ट्रीटमेंट्स जशजशा पुढे जातात तसेतसे त्वचेच्या सहनशीलतेनुसार लेसरची तीव्रता वाढवणे सुरक्षित होते त्याचबरोबर नियमित सनस्क्रीन लोशनचा वापर व अतिरिक्त सूर्यप्रकाश टाळण्यासाठी त्वचेचे टँनिंग कमी होऊन ती जास्त तीव्रतेचे लेसर झेलू शकते.
केशमुळांवर लेसरचा परिणाम होण्यासाठी त्वचेवरील केसांची गरज नसते. किंबहुना त्वचेवरील केस हे उपचारापूर्वी अलगदपणे क्लिपरच्या सहाय्याने साफ करावे लागतात. डायोड लेसर उपचारापूर्वी तर क्लिपरनंतर हलके रेझर फिरवावे लागते. असे जर केले नाही तर केसांच्या त्वचेच्या वर डोकावणारा भाग एखाद्या नायलॉनच्या धाग्यासारखा जळून त्वचेला चटका देऊ शकतो.
त्वचेखालील केस व केशमूळांतील केसांचा गोल भाग ज्याला बल्ब म्हणतात हेच लेसर किरणांचे लक्ष्य असते. वॅक्सिंग,प्लकिंग, थ्रेडींग, ट्विझिंग व डीपीलेटरी क्रीमचा वापर केल्यानंतर २ ते ३ आठवडे लेसर उपचार करता येत नाहीत, कारण अशा मुळ्यामध्ये लेसर कीर्णनाचे लक्ष्य असलेले केसच नसल्याने ते कोणताही परिणाम न करता आरपार निघून जातात, तीन आठवड्यानंतर मात्र त्या मुळांमध्ये नवीन केस व बल्ब तयार झाल्याने जरी तो त्वचेबाहेर दिसत नसला तरीसुद्धा लेसर उपचार दिला जातो व तो परिणामकारक ठरतो.
उपचार करतेवेळी क्लायंटला लेसर किरणांपासून डोळ्यांचे संरक्षण करणारा चष्मा घातला जातो. त्यामुळे डोळ्यांना इजा पोहोचत नाही. उपचाराची जागा बर्फाने थंड करून त्यावर थंड जेली लावली जाते. या जेलीवर लेसर हेड ठेऊन हलकासा दाब दिला जातो आणि लेसर लाईटचा शॉट देतात. लेसर किरणांची उष्णता केशमुळांपर्यंत पोहोचतात अगदी क्षणार्धासाठी सुक्ष्मतम सुया टोचल्याची जाणीव होते परंतु हे सर्व अगदी झटपट झाल्याने त्यामुळे वेदना होत नाहीत. या उष्णतेमुळे केसमुळ नष्ट होऊन त्वचेखालील केसांचा भाग काही आठवड्यात आपोआपच गळून पडतो.
या उपचारासाठी काही मिनिटांचा अवधी लागतो व उपचारानंतर काही वेळासाठी तो भाग लाल होणे किंवा डांस चावल्यासारख्या छोट्या छोट्या गांध्या उठणे याखेरीज याचा शरीरावर कोणत्याही प्रकारचा साइड इफेक्ट होत नाही. हा उपचार कोणत्याही वयोगटातील स्त्री - पुरुष व लहान मुलांनादेखील घेता येतो. लहान मुलांना मात्र काही वेळेला कमी अवधीच्या भुलेखाली हा उपचार द्यावा लागतो कारण डोळे बंद केल्यामुळे ती घाबरतात आणि उपचारावेळी हलून व दचकून चालत नाही कारण मग बाजूला इजा होऊ शकते.