' सौंदर्यवर्धक सर्जरी '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
स्त्री पुरुष या दोहोंच्या शरीराच्या निरनिराळ्या भागावरील, जसे की पोट, हिप्स (कटी), नितंब, मांड्या, दंड आणि ब्रेस्ट मध्ये साचलेली आणि बेढब दिसणारी चरबी सक्शन मशीनने कायमची काढून शरीर सुडौल व बांधेसूद केले जाते.काही लोकांच्या बाबतीत शरीराच्या ठराविक भागावरच अतिरिक्त चरबीचा संचय जास्त प्रमाणात होतो, त्याला एल एफ डी अर्थात लोकलाईस्ड फॅट डिपॉसिट्स असे म्हणतात. अनुवंशिकतेमुळे अशा काही ठराविक भागात चरबीच्या पेशींची संख्या जन्मतःच जास्त असल्याने असे डिपॉसिट्स तयार होतात. डायटिंग आणि व्यायामाने शरीरातील इतर ठिकाणची चरबी कमी करता येते; परंतु एल एफ डी साठे मात्र काही केल्या हटत नाहीत त्यामुळे शरीर बेढब दिसू लागते. डायटिंग किंवा जिमने टच्च भरलेल्या चरबीच्या पेशींचा आकार काही अंशी कमी होतो; परंतु त्या भागातील पेशींची संख्या मात्र आधी होती तितकीच राहते.भविष्यात संधी मिळताच त्या पूर्ववत टच्च भरतात आणि वजनकाटा पूर्वपदावर येऊन ठेपतो. स्थूलतेपासून सुटका करून घेण्यासाठी 'लायपोसक्शन ' हि परिणामकारक उपचार पद्धती आहे. हि 'डे केअर' म्हणजे सकाळी येऊन संध्याकाळी घरी जाता येणाऱ्या प्रकारातील सर्जरी आहे. यामध्ये चरबीच्या थरात औषधमिश्रित सलाईन सोडून ती आधी पातळ केली जाते. आणि ४ मि.मि. च्या छोट्या छेदातून लांब पोकळ नळ्याद्वारे हि आधीच पातळ केलेली चरबी शोषून काढली जाते. 'फॅट सक्शनिंग' हि अशी एकमेव पद्धत आहे कि जिच्यात चरबीच्या पेशी शरीराबाहेर काढून टाकल्याने त्या भागातील त्यांची संख्या कायमची कमी होते आणि भविष्यात तो भाग परत कधीच बेडौल होत नाही. लायपोसक्शन हा वजन कमी करण्यापेक्षा शरीर बांधेसूद करण्याचा अतिशय खात्रीशीर आणि सहज सोपा उपाय आहे.
फक्त दिसण्यासाठीच नव्हे तर तंदुरुस्त आणि दीर्घायुषी व्हायचे असेल तर शरीरात अतिरिक्त चरबीच्या थारा देऊन चालणार नाही म्हणून पूर्वीच्या स्लिम आणि ट्रिम ची जागा आता स्लिम आणि फिट घेऊ लागलीय.
पूर्वी ज्या सिनेतारकांच्या सौंदर्याला 'मादक' अशी उपाधी जोडली जायची त्यांचे चित्रपट आता पाहताना सध्याच्या तरुणाईच्या तोंडून 'अय्या ! कित्ती जाड आहे !' अशी प्रतिक्रिया नकळत उमटते. समाजमनातील सौंदर्यविषयीच्या या बदललेल्या व्याख्यांचा प्रवास फिगर क्वॅशस पासून सुरु होऊन स्लिम आणि ट्रिम मध्ये जात सध्या झिरो फिगर पर्यंत येऊन पोहोचला आहे.