' लेसर उपचार '
तारुण्याचा ध्यास हा अनादि व अनंत आहे. आपण चिरतरुण रहावे किंवा किमान तरुण दिसावे असे सर्वानांच वाटते. वार्धक्य जरी कोणाला चुकलेले नसले तरी वयपरत्वे येणाऱ्या शारीरिक वार्धक्याविरुद्ध निसर्गातील पंचमहाभूतांच्या प्रभावामुळे त्वचेचे वार्धक्य तरुणपणीच येऊ शकते याची बऱ्याच जणांना कल्पना नसते. त्याचाच दृश्य परिणाम म्हणून भुवयांच्या मध्ये उभ्या, कपाळावर आडव्या आणि डोळ्याच्या बाजूला स्पोक्स प्रमाणे दिसणाऱ्या आठ्या दिसायला चालू होते. यामागील कारणांमध्ये चेहऱ्याचे स्नायू जाड आणि अतिकार्यक्षम असणे आणि भावना व्यक्त करण्याच्या विशिष्ट सवयींमळे त्यांचा अतिवापर होणे हे सुद्धा एक प्रमुख कारण आहे. सौंदर्यशास्त्रातील नवनवीन शोधामुळे आता वर्हल्याच्या अशा पाऊलखुणा वेळीच मिटवता येणे शक्य झाले आहे. बोटॉक्स इंजेक्शनने हे स्नायू अंशतः कुंकुवात केले जातात, त्यामुळे आठ्यांचे जाळे नाहीसे होऊन चेहरा ताजातवाना आणि तरुण दिसतो. गुरुत्वाकर्षण वर्षानुवर्षे अविरतपणे चेहऱ्याचे स्नायू आणि त्वचेवर आपला प्रभाव गाजवीत असते, त्यामुळे उतार वयात चेहऱ्याच्या मधल्या भागातील स्नायू आणि त्वचा खाली ओघळते. तरुणाईला खाली निमुळता होत गेलेला चेहरा आधी चौकोनी आणि नंतर खाली रुंद होत जातो. अशा चेहऱ्याच्या मधल्या भागात ठराविक ठिकाणी त्वचेखाली स्वतःची चरबी वापरून हे कालचक्र काही अंशी मागे फिरवण्याची किमया आता साधली गेली आहे; परंतु चरबी हि त्वचेखालीच वापरता येत असल्याने त्वचेवरील सुरकुत्या आणि आठ्या नाहीशा करण्यासाठी मात्र तयार ' फिलर्स ' वापरावे लागतात . त्वचेच्या खालच्या थरापासून वरच्या थरापर्यंत वापरता येणारे 'फिलर्स' आता उपलब्ध असून त्यांचा वापर सुरक्षित आहे
तरुणाईतील जोश, मित्र-मैत्रिणींचा आग्रह, प्रेमातील आणाभाका किंवा रूढी म्हणून कपाळ, हनुवटी, हात, दंड, तसेच छातीवर
गोंदवून घेतात. कालांतराने त्यांच्या जीवनातील आणि विचारसरणीतील बदल किंवा त्यांचा शैक्षणिक आणि आर्थिक दर्जा उंचावल्यामुळे हि गोंदने त्यांना एखाद्या शल्यासारखी सतत बोचत राहतात. ती घालवण्याच्या प्रयत्नात मग चुना आणि पापडखाराचे मिश्रण लावणे, पार्लर मध्ये सुयांनी टोचुन घेणे किंवा उदबत्तीने डागणे यासारखे अघोरी प्रकार केले जातात. परंतु त्यामुळे गोंदण
परवडले पण मागे राहिलेला व्रण नको, असे म्हणण्याची वेळ त्यांच्यावर येते.
गोंदण घालविणे हे म्हणावे तितके सोपे नसते, कारण कायमचे रहावे म्हणूनच तर गोंदवून घेतात. गोंदविताना कार्बन कण, शाई आणि रंगाचे मिश्रण अणुकुचीदार सुयांच्या सहाय्याने त्वचेत खोलवर टोचतात. सुया आत जाणारे मार्ग भरून आल्यानंतर रंगीत कण त्वचेत
रुतून बसतात. या कणांचा आकार मोठा असल्याने शरीरातील उत्सर्जनाचे कार्य करणाऱ्या पेशी त्यांना गिळंकृत करून काढून टाकू शकत नाहीत. प्लास्टिक सर्जरीने लहान आकाराची गोंदणे काढता येतात; परंतु त्यामुळे लहान का असेना, व्रण हा मागे राहतोच. आता मात्र लेसरमुळे या सर्व अडचणींवर मात केली आहे. नॅनोतंत्राच्या 'क्यु-स्वीच्ड' लेसरने कोणत्याही रंगाचे गोंदण काही सिटिंग्जमध्ये कसलाही व्रण मागे न ठेवता अगदी खोडल्यासारखे अलगदपणे काढता येते.